माझा शेतकरी राजा सुखी आणि समृद्ध होऊ दे! – मा.राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे बिरोबाला साकडे

शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क:

इंदापूर (रूई) प्रतिनिधी:लाखों भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भरणेवाडी येथील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थानच्या यात्रेला सुरवात झाली आहे. ही यात्रा चालू वर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्त इंदापूर तालुक्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आ. दत्तात्रय भरणे यांनी आज गुरुवारी भरणेवाडी येथील श्री क्षेत्र बिरोबारायाचे मनोभावे दर्शन घेतले. माझा शेतकरी राजा सुखी आणि समृद्ध होऊ दे अशा प्रकारची प्रार्थना यावेळी भरणे यांनी बिरोबा चरणी केली.

ही यात्रा मंगळवार (दि. ११) पासून सुरू झाली असून मंगळवारी सकाळी सात वाजता घट उद्यापणाचा कार्यक्रम पार पडला. बुधवारी दि. १२ रोजी सायंकाळी श्रींचा छबिना व मिरवणूक पार पडली असून गुरुवारी दि. १३ रोजी मुख्य यात्रा पार पडत आहे. या यात्रेकरिता विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष मधुकर भरणे यांनी सांगितले.

देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधांची तयारी करण्यात आली आहे. यात्रेदिवशी रात्री नऊ वाजता यात्रेकरूंसाठी करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेला राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी होते. दिवाळीपूर्वी होणारी ही यात्रा १२ दिवस सुरू असते. कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर देवाची घटस्थापना होते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या मंगळवारी देवाच्या पारण्याचा कार्यक्रम असतो. गेली २०० वर्षांची परंपरा या यात्रेला असून भरणे यांच्या बेटाला देवाच्या पूजेचा मान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!