राष्ट्र सेवा दल ७५वा सामाजिक सलोखा सप्ताह संपूर्ण भारतभर राबिवणार! तर पंढरपूर येथे सप्ताहाचे ११मे रोजी आयोजन
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
इंदापूर : राष्ट्र सेवा दलाच्या वतीने दि.१ मे ते १० मे या कालावधीमध्ये सामाजिक सलोखा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सांगता ११ मे रोजी पंढरपूर येथे होणार असल्याची माहिती राज्य संघटक गफूरभाई सय्यद यांनी दिली.
दि.१ मे १९४७ ते १० मे १९४७ या कालावधीत विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यासाठी साने गुरुजी यांनी अमरण उपोषण केले होते. त्यानंतर १० मे १९४७ रोजी विठ्ठल मंदिर हे सर्वांसाठी खुले करण्यात आले. या घटनेस ७५ वर्षे पूर्ण झाले आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दलाच्या वतीने दि.१ मे २०२२ ते १० मे २०२२ या कालावधीत संपूर्ण भारत भर सामाजिक सलोखा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान समाजामध्ये जनजागृती करण्यात आली.
दि.११ मे रोजी या सप्ताहाची सांगता पंढरपूर याठिकाणी होणार आहे. यादिवशी समता दिंडी काढण्यात येणार आहे.
या सप्ताहाची सांगता वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आ. कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जेष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा, राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र सचिव नवनाथ गेंड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती राज्य संघटक गफूरभाई सय्यद यांनी दिली.