इंदापूर तालुक्याचे विकासरत्न हरपले! ज्येष्ठ समाजसेवक गोकुळशेठ शहा यांचे निधन
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क: इंदापूर (१० सप्टेंबर) :- गांधीवादी विचारक, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष, थोर समाजसेवक, तसेच इंदापूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक गोकुळदास विठ्ठलदास शहा यांचे शनिवारी (१० ऑगस्ट) सकाळी ७ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज (१० सप्टेंबर) दुपारी ४ वा. इंदापूर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी (३ ऑगस्ट) त्यांच्या पत्नी व इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या मातोश्री शकुंतला गोकुळदास शहा यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले होते. त्यामुळे शहा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गोकुळदास शहा म्हणजे इंदापूर तालुक्यातील असंघटित कष्टकरी, शेतकरी व अलक्षिक्तांसाठी नारायणदास शहा यांनी सुरू केलेली शिक्षणाची शास्वत ज्ञानगंगा शुद्ध व वाहती ठेवणारा द्रष्टा. त्यांनी देशातील नामांकित कापड उद्योगपतींमध्ये कष्टाळू व धोरणी व्यापारी म्हणून अल्पावधीत स्वतःही खास ओळख निर्माण केली होती. साने गुरुजी, एस. एम. जोशी व ना. ग. गोरे यांच्यासारखे कार्यकर्ते व विचारवतांची मंदियाळी लाभलेला व राष्ट्रसेवा दलाच्या विचारांनी संस्कारीत झालेला समाजसेनानी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व, तसेच इंदापूर शहराच्या जडणघडणीतला साक्षीदार हरपल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते. १९६६-१९६९ पर्यंत इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या एकूणच कार्याची दखल घेत त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ३ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला होता. ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ राष्ट्र सेवा दलाच्या या विचाराने प्रेरणा घेऊन गांधीवाद जपणाऱ्या गोकुळदास शहा यांचे आयुष्य पुढील अनेक पिढ्यांना ऊर्जा व प्रेरणा देणारे आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली