बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींची शिक्षा माफ केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस
नवी दिल्ली : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींची शिक्षा माफ केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणातील ११ दोषींना राज्य सरकारकडून मुक्त करण्यात आल्याबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी दोषींच्या सुटकेला आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारकडे विचारणा केली आहे. ‘दोषींची मुक्तता होणे हे सामाजिक आणि मानवाधिकार पातळीवरील सपशेल अपयश आहे,’ असे मोइत्रा यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. यापूर्वीही माकप नेत्या सुभाषिनी अली, पत्रकार रेवती लौल आणि माजी प्राध्यापिका रूपरेखा वर्मा यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस पाठवली होती. याचिकाकर्त्यांच्या बाजुने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करीत आहेत.