इंदापूरमध्ये ३ हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश! शहा परिवाराची ४० वर्षांची परंपरा; शिक्षणात नावीन्य व परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित
इंदापूरमध्ये ३ हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश
शहा परिवाराची ४० वर्षांची परंपरा; शिक्षणात नावीन्य व परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित
इंदापूर (प्रतिनिधी) — स्वातंत्र्य दिनानिमित्त इंदापूर शहर व परिसरातील ३ हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले. श्री नारायणदास रामदास ट्रस्टचे प्रमुख मुकुंदशेठ शहा व भरतशेठ शहा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
गेल्या चार दशकांपासून शहा परिवार ही सेवा परंपरा जपत आहे. यावर्षी दादासाहेब पाटील विद्यालय (कांदलगाव), राधिका विद्यालय (इंदापूर), हनुमान विद्यालय (अवसरी), श्रीनाथ विद्यालय (वडापुरी), मूक-बधिर व मतिमंद शाळा (इंदापूर), न्यू इंग्लिश स्कूल (इंदापूर), तरंगवाडी विद्यालय, आश्रम शाळा (इंदापूर) व कळाशी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश प्रदान करण्यात आले.
यावेळी मुकुंदशेठ शहा व भरतशेठ शहा म्हणाले, “विद्यार्थ्यांचे स्वप्न मोठे असावे, ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडावे, अभ्यासक्रमाबरोबरच अतिरिक्त ज्ञान मिळवावे. अपयशाला घाबरू नका; तेच यशाकडे नेणारे पाऊल आहे.”
स्थानिक समाजाच्या सहभागातून शिक्षणाला नवा आयाम देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.