सौ.अंकिता शहा यांनी जनतेसमोर मांडला पाच वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा!
इंदापूर, दि. ५ नोव्हेंबर:
इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामांचा आणि सामाजिक उपक्रमांचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे. ‘आढावा पुस्तक’ या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा अहवाल नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू केली असून, या उपक्रमाची सुरुवात प्रभाग क्रमांक सहा येथून करण्यात आली आहे.
अंकिता शहा यांनी स्वतः घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत, नगरपालिकेच्या कामकाजाचा आणि विकास प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा जनतेसमोर सादर केला.
त्यांच्या कार्यकाळात इंदापूर नगरपालिकेने ‘थ्री स्टार सिटी’ म्हणून मानांकन मिळवले असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या. सोलर पॅनल विक्री स्टॉल, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, तसेच महिला सक्षमीकरण आणि स्वच्छता अभियान यासारखे उपक्रम त्यांनी यशस्वीरीत्या राबवले.
याशिवाय, अंकिता शहा यांनी पतंजली परिवाराच्या रक्षाबंधन कार्यक्रमात सहभाग घेत, सामाजिक ऐक्य आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर नगरपालिकेने विविध शासकीय योजना आणि नागरिकाभिमुख उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केले.
आगामी इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा परिवाराने पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अंकिता शहा यांचे हे आढावा पुस्तक पारदर्शकतेचे आणि जनतेशी थेट संवाद साधण्याचे प्रतीक ठरत असल्याची चर्चा नागरिकात रंगत आहे.
