इंदापूर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडीचे किर्तीकुमार वाघमारे यांचा अर्ज दाखल!
इंदापूर प्रतिनिधी :इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून किर्तीकुमार हनुमंत वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निर्धारित वेळेत सादर केलेला हा अर्ज आज झालेल्या छाननी प्रक्रियेत वैध ठरला.
अर्ज दाखल करण्याच्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचे दिसून आले. पक्षाच्या ताकदीचे व्यापक दर्शन या प्रसंगी घडल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले.
अर्ज दाखल झाल्यानंतर वाघमारे यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीत इंदापूर शहरात वंचित बहुजन आघाडीची उपस्थिती अधिक ठळकपणे दिसून येईल. शहरातील गोरगरीब, वंचित तसेच अल्पसंख्याक घटकांसाठी न्याय्य आणि विकासाभिमुख कामे करण्याचा पक्षाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंदापूर शहर तसेच तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या विविध शाखा कार्यरत असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही पक्ष संपूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नगराध्यक्ष पदासाठी वाघमारे यांच्या उमेदवारी अर्जाला मंजुरी मिळाल्याने पक्षाच्या स्थानिक पातळीवरील तयारीस अधिक चालना मिळाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
