खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. २८: मुळशी तहसील कार्यालयाअंतर्गत खोट्या कागदपत्राच्याआधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २०३ भोर मतदार संघ ता. मुळशी येथील पिरंगुट व यादी भाग क्र. २०४ मुकाईवाडी येथे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज क्र.६ दाखल करण्यात आले. या अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयक जोडण्यात आले होते. याबाबत शंका आल्याने महावितरणच्या संकेतस्थळावर पडताळणी केली असता विद्युत देयकांवरील नाव व पत्त्यात तफावत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी खोटे विद्युत देयक रहिवासी पुरावा म्हणून सादर केल्याबद्दल गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नजीकच्या तहसील किंवा तलाठी कार्यालय, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोर तसेच तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी रणजीत भोसले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!