नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी – प्रविण माने

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी – प्रविण माने

काल रविवार दिनांक २५ मे रोजी इंदापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने सर्वत्र प्रचंड नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. मे महिन्याच्या अखेरीस आपल्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस कधी होत नसल्याने, अवकाळी ओढवलेल्या या परिस्थितीने शेतकरी बांधवांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ढगफुटीसदृश पावसाने, नीरा नदीच्या पाणी पातळीतदेखील अचानक वाढ होऊन, नदीच्या काठावरील गावांतून पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे एकीकडे ढगफुटीसारखा पाऊस व त्यावर नीरा नदीच्या पुराने नागरिकांची चांगलीच दैना झाल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.

इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे,भिगवण,मदनवाडी, भिगवण स्टेशन, सणसर, जांब, कुरवली, चिखली, उद्धट, लाकडी, निंबोडी आदी गावांसह नीरा नदी काठची गावे हि विशेष बाधित झाल्याची परिस्थिती आहे. या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने येथील कुटुंबांनचे मोठे नुकसान झाले आहे.

नागरीवस्तीप्रमाणे दुसरा सर्वांत जास्त बाधित घटक म्हणजे शेती असून, कालच्या ढगफुटीसदृश अवकाळी पावसाने डाळिंब, द्राक्षे, पेरू, केळी या फळबागांचे तसेच मका, कांदा, भुईमुग, चारा पिकांसह शेतातील इतर सर्व पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाण्याचा लोंढा प्रचंड असल्याने शेतीतील माती वाहून गेली असून, काही प्रमाणात पशुधनाचेही नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले.

इंदापूर विभाग हा तसा कमी पावसाचा प्रदेश परंतु कालच्या ढगफुटीसदृश पावसाने छोट्या छोट्या ओढ्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याची परिस्थिती झाली होती. यातून शिकवण घेऊन तालुक्यातील नागरिकांना आगामी पावसाळ्यात सावधतेने राहणे अतिशय गरजेचे होणार आहे. तसेच तालुक्यात अद्याप काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर असून येत्या पावसाळ्यात हि परिस्थिती अतिशय हालाकीची होण्याची परिस्थिती आहे, यामुळे पावसाने उघडीप दिल्यावर या रस्त्यांची कामेही गुणावत्तापूर्वक पद्धतीने व्हायला हवी.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रविण माने यांनी अवकाळी पाऊसाने बाधित गावांना भेट देत पाहणी केली. शेती पिके, फळबागा, घरे, व मालमत्ता यांचे कृषी, महसूल, ग्रामविकास खात्याने तातडीने पंचनामे पूर्ण करून, कुठल्याही शेतकरी बांधवावर अन्याय होणार नाही या पद्धतीने काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना माने यांनी दिल्या. याचसह कालच्या पावसाने रस्ते व पुल यांचेही अतोनात नुकसान झाले आहे, त्याचीही तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी प्रशासनाकडे करण्यात आली असून, शासनाच्या माध्यमातून नागरिकांना तातडीने मदत मिळण्याकरता आपण स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचा शब्द माने यांनी नागरिकांना दिला.

या पाहणी दौऱ्यात कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मयूरसिंह पाटील, शेटफळगढे गावचे सरपंच शंकर राऊत, अमोल साळुंखे, अमोल झगडे, संदीप मचाले,माऊली भोसले, रोहित कदम, अनिल घोरपडे, अशोक जगताप, शिवाजी मचाले, अविनाश मचाले, दिपक वाबळे, सतीश मचाले,अमोल मचाले,आदित्य हिडगे,अमोल मचाले, किरण खोचरे, पंढरीनाथ कदम,पंडित जोशी,तलाठी गर्जे भाऊसाहेब, ग्रामसेवक अशोक कदम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया – इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावांवर ओढवलेली परिस्थिती हि अतिशय भयंकर असून, नदी किनाऱ्यावरील स्थलांतरीत नागरिकांसह, शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देवून त्यांचे अश्रू प्रशासनाने तातडीने पुसावेत हीच माझी प्रमुख मागणी असून, यासाठी मी जातीने पाठपुरावा करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!