मानवी जीवनाचे वास्तव जीवन दर्शन अण्णाभाऊंच्या साहित्यातून होते- हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी दि. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी जीवनभर विविध क्षेत्रात केलेले कार्य महान असून, आजच्या समाजाला अण्णाभाऊचे कार्य प्रेरणादायी आहे. अण्णाभाऊंनी विपुल साहित्य निर्माण केले, त्यांच्या साहित्यावर शेकडो पीएचडी केल्या गेल्या, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.१) काढले.
इंदापूर तालुक्यात विविध गावांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त हर्षवर्धन पाटील यांनी भेट देत अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले तसेच अण्णाभाऊंच्या प्रतिमांचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. सदर प्रसंगी विविध गावांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, अण्णाभाऊंची फकीरा कादंबरी घराघरात पोहचली आहे. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ मध्ये राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. रशिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी अजरामर केले आहे.
अण्णाभाऊंनी ३५ कादंबऱ्या, ३ नाटके, १० पोवाडे लिहले. त्यापैकी ८ कादंबऱ्यांवर मराठी चित्रपट निघाले. परिवर्तन चळवळीला बळ देणारे साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केले. मानवी जीवनाचे वास्तव जीवन दर्शन त्यांच्या साहित्यातून होते, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित जयंती कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
_____________________________
फोटो:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विविध कार्यक्रमांमध्ये अभिवादन करताना हर्षवर्धन पाटील.