इंदापूर नगरपरिषद निवडणूक२०२५ :भरतशेठ शहा यांची एका वृत्तवाहिनीने घेतलेली मुलाखत!
इंदापूर नगरपरिषद निवडणूक २०२५इंदापूर – एका राष्ट्रीय न्यूज चॅनलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निर्माण झालेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना भरत शेठ शहा यांनी “जिल्हाध्यक्षांनी माझ्यामुळे राजीनामा दिला, किंवा मी कोणावर दबाव आणला, हे सर्व दावे वस्तुस्थितीपासून दूर आहेत” असे स्पष्ट केले. “मी कधीच ‘त्यांना काढा आणि मला घ्या’ असे म्हटले नाही. हा पूर्णपणे पक्षांतर्गत निर्णय आहे,” असे त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर या तीन शक्ती एकत्र आल्याबाबत विचारले असता शहा म्हणाले की, “या तिन्ही नेत्यांचे तालुक्यात योगदान आहे, पण आम्ही त्यांना कोणतेही आव्हान दिलेले नाही. आमचे काम, जनतेशी असलेली कुटुंबाची नाळ आणि पक्षाची ताकद आमच्या पाठीशी आहे याबाबत आम्ही ठाम आहोत.”
नगरपरिषद कार्यकाळात शहरातील कामकाजाबाबत ते पुढे म्हणाले की, इंदापूरमध्ये पाणी, वीज, रस्ता, कर्मचारी वेतन, नव्याने उभारलेल्या इमारती, शॉपिंग सेंटर यांसारखी अनेक कामे पूर्ण झाली. “विकासकामांमध्ये सातत्य ठेवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. मामांनी दिलेल्या निधीमुळे अनेक प्रकल्पांना गती मिळाली आणि पक्षानेही याची दखल घेऊन मला उमेदवारी दिली,” असे त्यांनी सांगितले.
पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, “पैसे वाटून निवडणूक होत नाही. जनता माणसाशी असलेली नाळ आणि प्रत्यक्ष झालेले विकासकाम यावर मत देते. इंदापूरची जनता आमच्यावर प्रेम करते आणि ते आम्हाला भरघोस मतांनी विजयी करतील याची आम्हाला खात्री आहे.”
अजित पवार यांनी मंजूर केलेल्या शिरसोडी ते कुगाव पूलामुळे इंदापूरची बाजारपेठ चौपट वाढेल, त्यामुळे “बाजारपेठ नियोजनबद्ध करणे ही काळाची गरज आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी शहा म्हणाले, “निर्णय जनता घेणार आहे आणि इंदापूरची जनता सुजाण आहे. आम्हाला त्यांच्या निर्णयावर संपूर्ण विश्वास आहे.”
