इंदापूर नगर परिषद निवडणूक 2025 : अनुभवी कार्यकर्त्यांचा सूर आक्रमक; नव्या फळीला मोठी संधी, राजकीय गणिते ढवळून निघण्याची शक्यता!
इंदापूर :नगर परिषदेची 2025 मधील सार्वत्रिक निवडणूक जशी जवळ येत आहे तशी राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), कृष्णा-भीमा विकास आघाडी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवार अशा विविध घटकांची ही लढत अधिकच सरशी घेणार, यात शंका नाही.
मात्र यंदाच्या निवडणुकीत काही पक्षांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची जोरदार चर्चा शहरभर रंगली आहे. काही पक्षांकडून अनुभवी, ज्येष्ठ आणि चाणाक्ष कार्यकर्त्यांना बाजूला सारून नव्या आणि तरुण कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली गेली आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात पक्षांना यश आले आहे; मात्र अनेक ठिकाणी नाराजी कायम राहिल्याने पक्षांतर्गत अशांतता स्पष्टपणे जाणवत आहे. याचा थेट परिणाम स्थानिक उमेदवारांच्या मतांवर आणि नगराध्यक्ष पदाच्या समीकरणांवर होऊ शकतो, अशी चर्चा जनतेमध्ये चांगलीच रंगलेली आहे.
इंदापूर शहरात युवक मतदारांचा मोठा दबदबा असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यंदाच्या निवडणुकीत तरुण फळी मोठ्या प्रमाणावर रिंगणात उतरली असून, पक्षांनीही नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. अनेक उमेदवार स्वतःही तरुण असल्याने या निवडणुकीत परिवर्तनाची झलक दिसते आहे.
मात्र ही नवी फळी पुढे आणताना ज्येष्ठ, अनुभवी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना ‘थांबा’ देण्यात आला किंवा काहींना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची भावना बळकट झाली आहे. गेली अनेक वर्षे पक्षासाठी श्रम केलेल्या या कार्यकर्त्यांना दूर ठेवल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही असंतोष वाढला आहे.
या नाराज कार्यकर्त्यांची पुढील रणनीती काय असेल? ते पक्षाशी निष्ठा राखून शांत राहतील की अपक्ष पद्धतीने मतं वळवण्याचा प्रयत्न करतील? त्यांच्या या भूमिकेमुळे मतांचे समीकरण कोणत्या दिशेने झुकणार? या सर्व प्रश्नांनी इंदापूरचे राजकीय वातावरण तापले आहे.
