इंदापूर नगरपरिषद निवडणूक : अजित पवारांच्या रॅली व सभेची तयारी; अनेक नेत्यांच्या वक्तव्यांनी तापली चर्चा!अजितदादा काय उत्तर देणार ?
इंदापूर : इंदापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या तयारीला वेग आला असून शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष भरतशेठ शहा आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर ही रॅली काढण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
रॅली रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता श्रीराम चौक, इंदापूर येथून सुरू होणार असून जामदार गल्ली, नेहरू चौक, आंबेडकर चौक, खडकपुरा, व्यंकटेश नगर मार्गे बाबा चौकात समारोप होणार आहे. दरम्यान, कृष्णा भिमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांनी अलीकडेच पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या सभेत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. आपल्या भाषणात त्यांनी उमेदवारी निवडीबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच, “जर पक्षाने आम्हाला कोलले तर आम्हीही पक्षाला कोलू,” असे वक्तव्यही त्यांनी केले होते. याशिवाय पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या संदर्भातील त्यांच्या विधानांनाही चर्चेचा विषय मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर उद्याच्या सभेत अजित पवार कोणती भूमिका स्पष्ट करणार याकडे राजकीय वर्तुळासह इंदापूरकरांचे लक्ष लागले आहे. निवडणूक समीकरणांवर सभेतील विधानांचा प्रभाव पडू शकतो, अशी चर्चा आहे.
आयोजकांनी सर्व नागरिकांना शांततेत आणि शिस्तबद्धतेने कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
