इंदापूरच्या खेळाडूंना सोन्याचे पर्व! क्रीडा संकुलासाठी तब्बल ५५.१६ कोटींचा मंजूर निधी!
इंदापूर (प्रतिनिधी ): इंदापूरवासीयांसाठी मोठी आनंदाची बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून आणि राज्याचे कृषी मंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे इंदापूरमध्ये भव्य आणि अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ५५.१६ कोटी रुपयांचा विशेष अध्यादेश आज जाहीर केला आहे.
यापूर्वी या प्रकल्पासाठी ६.७९ कोटी रुपयांचे प्राथमिक अंदाजपत्रक मंजूर झाले होते. मात्र आता राज्य क्रीडा विकास समितीच्या ६ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीत, वाढीव प्रकल्प खर्च लक्षात घेता सुधारित ५५.१६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक पुढे आले आणि त्याला शासनाची मान्यता मिळाली आहे.
सर्वसामान्यतः तालुका क्रीडा संकुलासाठी केवळ ५ कोटींचे अनुदान मंजूर केले जाते. काही ठिकाणी अपूर्ण संकुलासाठी ३ कोटींपर्यंत निधी दिला जातो. मात्र इंदापूरला थेट ५५.१६कोटी रुपयांचा निधी मिळणार असून ही बाब इंदापूरसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
हे क्रीडा संकुल इंदापूरमधील युवकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल. या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह असून, आमदार दत्तात्रय भरणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
इंदापूरच्या क्रीडा क्षेत्राची “बल्ले बल्ले” सुरु झाली असून, आता ही संधी सोन्यात रूपांतरित करायची जबाबदारी खेळाडूंची आहे.