मालोजीराजे गढीवरील बाधितांचे तत्काळ पुनर्वसन करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – आर.पी.आय (आठवले गट)इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे
मालोजीराजे गढीवरील गरीबांची घरे पाडून प्रभावशालींची वाचवली?
गढीवरील बाधितांचे तत्काळ पुनर्वसन करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – बाळासाहेब सरवदे
इंदापूर, १३ ऑगस्ट(प्रतिनिधी ): इंदापूर शहरातील ऐतिहासिक मालोजीराजे गढी संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरू असताना अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाने पक्षपाती कारवाई केल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांनी केला आहे.
सरवदे यांनी सांगितले की, “गढीचा नकाशा व मोजमाप करून सीमारेषा निश्चित झाल्यानंतर सर्व अतिक्रमणे एकाच निकषावर हटवणे अपेक्षित होते. मात्र, ६०-७० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरीब मुस्लिम फकिरांची घरे ११ ऑगस्ट रोजी, तोही पावसाळ्यात, पाडण्यात आली. त्याउलट प्रभावशाली आणि धनाढ्य लोकांची अतिक्रमणे मात्र तशीच ठेवली गेली.”
त्यांच्या मते, या कारवाईत प्रशासनाने गरीबांवर अन्याय करत प्रभावशालींचे संरक्षण केले. “ज्यांची घरे पाडली गेली त्या कुटुंबांना तत्काळ निवारा देऊन पुनर्वसन करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर आर.पी.आय. (आठवले गट) रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा त्यांनी दिला.
या संदर्भात सरवदे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, बाधित कुटुंबांना न्याय मिळावा आणि राहिलेली सर्व अतिक्रमणे कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता हटवावीत, अशी मागणी केली आहे.