नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी वाहनांचा ताफा, दालनातील उपस्थितांची संख्या नियंत्रित; मिरवणूक, सभा, घोषणांना प्रतिबंध

पुणे,दि.१८: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान नामनिर्देशनासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात येताना आणावयाची वाहने, दालनात उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची संख्या नियं‍त्रित करण्याबरोबरच मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार उमेदवारांना जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात येताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील, या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

सदरचा आदेश दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!