इंदापूर येथे निवडणुकीकरीता नियुक्त अडीच हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

इंदापूर, दि.५: इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार इंदापूर श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता नियुक्त सुमारे २ हजार ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी इंदापूर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. मतदानाच्यावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

इंदापूरचे उपअधीक्षक भूमी अभिलेख रवींद्र पिसे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक विजयकुमार आतार यांनी केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, इतर सहायक कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.

इंदापूर येथे संकल्पपत्र लेखन

मतदार जागृती मंचाच्यावतीने जिल्हा परिषद शाळा इंदापूर क्र. ५ तसेच विठ्ठलराव थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, भिगवण येथे विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र लिहून घेण्यात आले. या संकल्पपत्रांवर पालकांकडून स्वाक्षरी घेवून विद्यार्थी त्यांना मतदानासाठी आवाहन करणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या परिचितांकडूनही संकल्पपत्र भरून घ्यावे अशा सूचना विस्तार अधिकारी संजय रुईकर आणि संजय खळदकर यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!