जिल्ह्यात आरोग्य विषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा
पुणे, दि. ५: जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे अनेक योजना राबविल्या जातात या योजनाची शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच गरजू रुग्णांना वेळेत योग्य उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य यंत्रनेने नेहमी तत्पर रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित आरोग्य विभागाच्या विविध योजनाच्या आढावा बैठकीत श्री डुडी बोलत होते. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात गरजू रुग्णांना उत्तम आरोग्य विषयक सेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी व उपचाराच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व साधन सामुग्री, औषध साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने रुग्णालयांनी दक्ष राहवे. तसेच आरोग्य सेवा सक्षम ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी नियमित आपल्या तालुक्याचा आढावा घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात पदभर्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा. अशा सूचना त्यांनी दिल्या.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण, रुग्णालय परिसराचे सुशोभीकरण, कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड, आवश्यक सोईसुविधा, साहित्य औषध खेरीदी आदी बाबींचा प्रस्ताव तयार करून प्रशासनाकडे पाठवा. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांनी आवश्यक बाबींची मागणी करावी. त्या सर्व बाबी त्यांना उपलब्ध करुन दिल्या जातील.
ससून रुग्णालयात उपलब्ध असलेल्या साधन सामग्री प्रमाणे ग्रामीण रुग्णालयांना साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल. आरोग्य विषयक सेवांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
****