कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आक्रमक वीजबील माफ करण्याची केली आग्रही मागणी
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२७: पुणे येथे खडकवासला कालवा व निरा डावा कालवा प्रकल्प सल्लागार समितीची बैठक आज पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या सह इंदापूर तालुक्याचे आमदार मा. दत्तात्रय भरणे, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. समाधान आवताडे, आ. राम सातपुते, मा. आ. दिपक साळुंखे, आ.दिलीप मोहिते ,आ. अशोक पवार, आ. सुनील शेळके आ. राहुल कुल, आ. चेतन तुपे पाटील उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान आ.भरणे वीजबीलाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झालेले पहावयास मिळाले. इंदापूर तालुक्यात सध्या महावितरण कडून शेतक-यांना कोणतीही पुर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.
या विषयावरून श्री.भरणे यांनी बोलताना सांगितले की,शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टी,अवकाळी तसेच अस्मानी संकटांचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.यामुळे आमच्या इंदापूर तालुक्यातील अनेक फळबागा तसेच इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.शेत शिवारात चार-चार महिने पाणी साचल्यामुळे वीजपंप बंद होते.मात्र असे असताना सुद्धा सरकार चालु वीजबिल भरण्याचा आदेश काढत आहे.हे अत्यंत चुकीचे असून आता उन्हाचे प्रमाण वाढल्याने पिके पाण्याला आली आहेत.परंतु प्रशासनाने विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतीला पाणी देणे शक्य होत नसल्याने हाता-तोंडाशी आलेली पिक पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर आहेत.याबाबत पालकमंत्री ना.पाटील यांच्याकडे तातडीने विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली तसेच वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने लेखी आदेश देऊन विद्युत पुरवठा खंडित करू नका असा आदेश देण्याची मागणीही केली.
याबाबत श्री.भरणे यांच्या मागणीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महावितरणच्या अधिका-यांना वीज पुरवठा न तोडण्याचे सांगून याबाबतचा शासन स्तरावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.