इंदापूर शहरात मुसळधार पाऊस; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व मा. उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी घेतला आढावा!
इंदापूर: शहरात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचून राहिले असून, पाणदरा परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. याची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी नगरसेवक भरत शेठ शहा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
या पाहणीदरम्यान त्यांनी गाळेधारक, व्यापारी, डॉक्टर, कर्मचारी तसेच नागरिकांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांना तात्काळ उपाययोजना राबवून चोख व्यवस्थापन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
कृषिमंत्री भरणे यांनी नागरिकांना दिलासा देत सांगितले की, पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर जलद गतीने तोडगा काढण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.
या पाहणीमुळे प्रशासनाच्या हालचालींना गती मिळून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.यावेळी मा. नगराध्यक्ष अशोक इजगुडे , व इतर मान्यवर उपस्थित होते.