ताज्या घडामोडी

इंदापूरच्या राजकारणात खळबळ! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षांचाच बंडाचा इशारा!

इंदापूर | अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवार निवड प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी थेट बंडाचा इशारा दिल्याने इंदापूरमधील राजकारण तापले आहे.

जेजुरी नगराध्यक्षपदासाठी अजित पवारांनी शरद पवार गटातील जयदीप बारभाई यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीत आधीच नाराजी होती. त्यातच आता इंदापूर नगरपरिषदेच्या उमेदवारीवरून गारटकर यांनी पक्ष नेतृत्वालाच इशारा दिला आहे.

अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत मतभेद स्पष्टपणे उफाळून आले. माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नांना गारटकर गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यानंतर गारटकर यांनी इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपली भूमिका ठामपणे मांडली.

“आमच्यामुळेच तुम्ही मंत्री झाला आहात. जर आमच्याशी अन्याय झाला तर आम्हीही पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही,” असा थेट इशारा गारटकर यांनी दिला. ते पुढे म्हणाले, “पक्षाने आमच्या भावना मान्य केल्या तर आम्ही अजित पवारांसोबतच राहू. अन्यथा राजीनामा देऊन स्वतंत्र आघाडी उभी करू. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करू, पण अन्याय सहन करणार नाही.”

इंदापूरमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दोन गटांत विभागली गेली आहे. गारटकर समर्थकांनी पक्षाविरोधात उभे राहण्याची तयारी दाखवली असून, भाजप आणि शरद पवार गटासोबत नव्या आघाडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या संभाव्य बंडखोरीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

इंदापूरच्या राजकारणातील या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढला असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणत्या दिशेने जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!