हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगल्यावर निनादले तुतारीचे स्वर…!
हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगल्यावर निनादले तुतारीचे स्वर
सिल्व्हर ओक ते भाग्यश्री बंगला असा तुतरीचा स्वर निनादला असून आजच्या पत्रकार परिषदेला हर्षवर्धन पाटील यांचा निर्णय कळणार आहे.
इंदापूर (प्रतिनिधी)हर्षवर्धन पाटील यांच्या सिल्व्हर ओक वरील भेटीगाठीअन् मुलाच्या व मुलीच्या स्टेटसवरील ‘तुतारी’, ने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेने भाजपचे नेते आणि या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे.
यातच हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली.दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. याच दरम्यान त्यांच्या मुलाने स्टेटसवर तुतारी चिन्ह ठेवले. त्यामुळे ते तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात यात किती सत्यता आहे हे उद्याच कळेल. आज शुक्रवारी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेऊन पुढील रणनिती जाहीर करणार आहेत. त्यांनी तुतारी हाती घेतल्यास दत्तात्रेय भरणे यांना शह बसणार आहे.
यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र हा भाजपाच्या हातून निसटत चालला आहे.
सिल्व्हर ओक वरील भेटीने त्यांचा तुतारी प्रवेश निश्चित मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांकडून तुतारी चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला असून तो अधिकाधिक तीव्र होत चालला आहे.
कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची असा निर्धार व चंग हर्षवर्धन पाटील यांनी बांधला आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अधिकृत संकेत मिळाले आहेत.
या चर्चेच्यावेळी अंकिता पाटील व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असल्याचे समजले जात आहे.
शरद पवार यांचा ७ तारखेला इंदापूरमध्ये मेळावा….
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार सात तारखेला इंदापूरमध्ये मेळावा घेणार आहे. त्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत दाखल होणार की नाही ? हे येत्या एक, दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. परंतु इंदापूरमधून शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटीलच असणार आहे, असे म्हटले जात आहे. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी दहा वाजता इंदापूरमध्ये पत्रकार परिषद ठेवली आहे. त्यात ते आपली भूमिका जाहीर करणार आहे
भिगवण येथे लागले बॅनर
सध्या इंदापुरात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात तापले आहे. त्यातच इंदापुर तालुक्यातील भिगवणच्या हर्षवर्धन पाटील प्रेमी शेतकऱ्यांनी बैलपोळ्याच्या निमित्त हर्षवर्धन पाटील २०२४ फिक्स आमदार, तुतारी वाजवणारा माणूस अशा आशयाचे पोस्टर लावले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.