जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे आयोजन अकरा लाखाहून अधिक जंतनाशक गोळ्यांचे वितरण होणार

पुणे, दि. ३: राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून ४ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यात सुमारे ११ लाख ६० हजार २७२ लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलांमुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे असा आहे. ही मोहीम केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास आणि शिक्षण विभागामार्फत सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयात मोहीम राबविण्यात येणार आहे.

या अंतर्गत सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रम शाळा, महानगरपालिका शाळा, सर्व खाजगी अनुदानित शाळा, सर्व खाजगी अनुदानित शाळा, सैनिकी शाळा, सी.बी.एस.सी. स्कूल, नवोदय विद्यालय, सुधारगृह, सर्व खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा, मदरसे, मिशनरी स्कूल, गुरुकुल, संस्कार केंद्र, सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय प्रथम वर्षाचे विद्यार्थी, नर्सिंग कॉलेज, आय.टी.आय., तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य व विज्ञान, फार्मसी महाविद्यालय. डी.एड. महाविद्यालय, सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्र आदी ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

जंतनाशक गोळीचे सेवन केल्यानंतर सौम्य प्रकारची लक्षणे आढळल्यास सावलीत विश्रांती घ्यावी तसेच स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे, तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रास घेवून जावे. याबाबत अधिक माहितीकरीता १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती डॉ. देसाई यांनी दिली आहे.

संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद: सक्षम भारताच्या निर्मितीसाठी सशक्त युवापिढी घडविणे अत्यंत महत्वाचे आहे. याकरिता ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात १०८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५४४ उपकेंद्र (आरोग्य मंदिरे) अंतर्गत असणाऱ्या ५ हजार ५७० शाळा आणि ४ हजार ६९३ अंगणवाडी व १६५ महाविद्यालय मध्ये एकूण ११ लाख ६० हजार २७२ इतक्या जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. पालकांनी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळी अवश्य घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!