सुदृढ समाजाच्या पाया उभारणीसाठी मुलांच्या चारित्र्य व नैतिक विकासाला पालकांनी प्राधान्य दिले पाहिजे -व्याख्याते प्रा.युवराज पाटील
सुदृढ समाजाच्या पाया उभारणीसाठी मुलांच्या चारित्र्य व नैतिक विकासाला पालकांनी प्राधान्य दिले पाहिजे. सुरक्षा व प्रेमानेच आपण मुलांना कुटुंबामध्ये एकत्र बांधून ठेवू शकतो असे प्रतिपादन व्याख्याते प्रा.युवराज पाटील यांनी व्यक्त केले.
इंदापूर(प्रतिनिधी):इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समिती आयोजित मालोजीराजे व्याख्यानमालेतील मुलांचे पालक बना,मालक नको या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब सरवदे,अतुल मोरे,किरण गानबोटे, ॲड.सचिन चौधरी,डॉ.ओंकार ताटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मूल्य व नैतिकतेवर आधारित शिक्षण पद्धती आवश्यक आहे.मुलांचा बौद्धिक,भावनिक व शारीरिक विकास झाला पाहिजे. शिक्षण हे जगण्यात उतरले पाहिजे.माहिती तंत्रज्ञान व मोबाईलच्या युगात तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मक पद्धतीने मुलांना करता आला पाहिजे.मुलांना पात्रतेनुसार निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे.आईवडीलांच्या कष्टाची जाणीव मुलांना असली पाहिजे.कुटुंबामध्ये प्रत्येक मुलाला आपण सुरक्षित आहोत असे वाटले पाहिजे.यासाठी पालकांनी वेळ व सुरक्षा याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.कुटूंबामध्ये संवाद असला पाहिजे.
यावेळी सचिन खुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.स्वागत मालोजीराजे व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम व सुनील गलांडे यांनी केले.सूत्रसंचालन संतोष नरूटे यांनी तर आभार शरद झोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिकेत साठे, विशाल गलांडे,अमोल साठे, संदिपान कडवळे,दीपक साळुंखे, रमेश शिंदे, दत्तराज जामदार ,आदित्य कदम,ओम जगताप ,तुषार हराळे,राहुल शेलार ,अक्षय क्षिरसागर यांनी प्रयत्न केले.