वाढत्या लंपीच्या आजारामुळे शासनाच्या आदेशनुसार अकलूजचा जनावरांचा बाजार तूर्तास बंद!
बावडा : राज्यात सध्यस्थितीत अनेक जनावरांना लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग झाला असून,जनावरे आजारी पडले आहेत.सांगोला येथील जनावरांचा आठवडे बाजारही लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.या रोगाचा प्रसार वाढू नये म्हणून राज्य शासनाच्या आदेशानुसार अकलूज येथील प्रसिद्ध असलेला येत्या सोमवारी (दि.१२) भरणारा जनावरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.
त्यामुळे गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या इत्यादी जनावरांचा दर सोमवारी भरणारा आठवडे बाजार हा राज्य शासनाचा पुढील आदेश येपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे.यामुळे शेतकरी बांधव, खरेदीदार, व्यापारी बंधूनी सहकार्य करावे, असे आवाहन सचिव राजेंद्र काकडे यांनी केले आहे.