परभणीतील संविधान विटंबना व सुर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ इंदापूरात १०० टक्के कडकडीत बंद!
इंदापूर(प्रतिनिधी):परभणीत गेल्या आठवड्यात संविधानाच्या विटंबनेवरून दंगल उसळली.या दंगल प्रकरणी पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशी याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला.
पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचे आरोप आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आरोप केले आहेत.
मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे परभणी शहरात तणाव निर्माण झाला.परंतु छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात न्यायलीन समितीच्या देखरेखीखाली इन कॅमेरा शवविच्छेदन झाले. आणि तपासणी अहवालात सोमनाथच्या अंगावर अनेक जखमा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याला शॉक फॉलोइंग मल्टिपल इन्जूरीज असे मृत्यूचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस खोटे दावे करत असल्याचे आंबेडकरी जनतेने सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
याचाच परिणाम म्हणून पुण्यातील इंदापूर तालुक्यात देखील पडसाद उमटले.दोन्ही घटना निंदनीय असून त्याच्या निषेधार्थ आज इंदापूर शहरात बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.
सर्व आंबेडकरवादी संघटना , पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बंद पुकारण्यात आला.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजार पेठ बंद होते.या आंदोलनाला मोठ्या संख्येने विचारवंत, नेते, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.